Friday 12 May 2017

हीच माझी कहाणी: भाग ३


मुंबईत येऊन आता जेमतेम दोन दिवस झाले होते. ह्या अनोळख्या बलाढ्य शहरात माझं कुणीही ओळखीचं नव्हतं असं जरी मी म्हटलं तरीही आता मात्र मला एक हक्काचं असं माणूस सापडलं होतं. त्या म्हणजे माझ्या केअर टेकर आजी. अगदी दोन दिवसांत आमची छान गट्टी जमली होती. वयानं जरी म्हाताऱ्या असल्या तरी त्यांच्यातील ऊर्जा इतकी अफाट होती की एखाद्या लहान मुलालाही लाजवेल. 
दिवसभर स्वतःला कामात बुडवून घ्यायचं. सतत काही ना काही काम सुरूच.

"काय रे समीर, आज रात्रीच्या जेवणात काय बेत करायचा?"

"अहो आजी, असं काही नाही तुम्ही नेहमी करता तसंच करा. उगाच माझ्यासाठी म्हणून वेगळं काही नको. खरंच"

"वेगळं वगरे काही नाही. उलट तुझ्या आवडीचं करायला मला आवडेल"

"कशाला हो उगाच. तुम्ही थकत नाही का? दिवसभर इतकं काम करत असता ते."

"इतकी वर्ष झाली. एकटीच राहतेय. सगळं स्वतः करते. आधी एकटेपणा जाणवायचा. हे रिकामं घर खायला उठायचं. मग स्वतःला कामात बुडवून घेतलं. मसाले, पापड, लोणची करून विकायचे.. असो.. माझ्या मेलीची बडबड आपली सुरूच राहणार.. तू सांग जेवणाचं काय ते? बिर्याणी करू का? आवडेल का?

"हो आजी. आवडेल"

आजीच्या त्या बोलण्यामागे कुठेतरी एक खंत जाणवली. प्रत्येक माणसाची अशी एक स्टोरी असते. तशीच आजींचीही होती. नक्कीच काहीतरी घडलं होतं त्यांच्या आयुष्यात. खोलवर कुठेतरी उरात जखम होती.
रात्री आजीच्या हातची चमचमीत बिर्याणी खाल्ली. अगदी मायेने त्यांनी केली होती.
जेवणानंतर आजी सगळं आवरून ठेवायच्या. दोन दिवसांत मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे त्या स्वच्छते बाबत फार काटेकोर होत्या. घर कायम नीट नेटकं असायचं.

"आजी ती ताटं द्या मला. मी आवरून ठेवतो"

"काही नको. तू आराम कर. रात्रही फार झाली आहे. झोप हवं तर. माझं होतच आलंय"

"झोप येत नाही मला. आजी जर तुम्हाला चालणार असेल तर आपण छान गप्पा मारूया का?"

"हो चालेल."

"तुम्हाला झोप तर आली नाही ना?"

"नाही. उलट तुझ्याशी गप्पा मारल्या तर छानच वाटेल"

आम्ही खिडकीपाशी बसून छान गप्पा टाकल्या. आजी मला मुंबई बद्दल सांगत होत्या. इतक्या वर्षात मुंबई कशी बदलत गेली त्या बद्दलही सांगत होत्या.
एकीकडे आजीच्या गप्पा तर दुसरीकडे खिडकीतून ती शांत तरीही गजबजलेली मुंबई दिसत होती.

"आजी तुमच्याशी गप्पा मारून खूपच मज्जा आली"

"मलाही छान वाटलं. इतक्या वर्षांनी कुणाशी इतक्या गप्पा मारल्या मी. पूर्वी मी आणि रोहन सुद्धा अशाच रात्री गप्पा मारत बसायचो."

"रोहन?"

"काही नाही. रात्र फार झाली आहे. चल झोपायला"
असं म्हणत त्या आतल्या खोलीत गेल्या. अन् मी पाहत राहिलो त्यांच्याकडे.. मनात असंख्य प्रश्न घेऊन.



to be continued...


- निनाद वाघ



No comments:

Post a Comment