Friday 5 May 2017

हीच माझी कहाणी: भाग २

हीच माझी कहाणी: भाग १ : https://hichmajhikahani.blogspot.in/2017/04/blog-post_28.html

रात्र झाली तशी मनातली भीती अजून वाढत होती. नेमकं काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी पुन्हा दादर स्टेशनकडे जावं आणि तिथल्या वेटिंग रूममध्ये राहावं असं मी ठरवलं. आईला ह्यातलं काहीच सांगितलं नव्हतं. नाहीतर उगाच ती काळजी करत बसली असती. 
सामान उचललं आणि प्लाझावरून दादर स्टेशनला निघालो. नेमका रस्ता माहिती नसल्याने असंच एका गल्लीत शिरलो तर तिथे मला स्वामींचा मठ दिसला. मठाची दारं बंद होती. फक्त एक छोटी खिडकी उघडी होती ज्यातनं स्वामींचा फोटो दिसत होता. मी हातातलं सामान खाली ठेवलं. डोळे मिटले अन् स्वामींकडे प्रार्थना केली.

"स्वामी आज मुंबईत पहिल्यांदा आलोय. काही स्वप्नं पाहिली आहेत ती पूर्ण करायला. तुमचा आशीर्वाद असुद्या. आता सुद्धा खूप एकटं एकटं वाटतंय. भीती वाटतेय. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी नक्कीच काहीतरी चांगलं योजिले असणार. ह्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा. लक्ष असुद्या"

तिथून पुन्हा स्टेशनकडे चालायला सुरूवात केली. इतक्यात खिशातला फोन वाजला. केअर टेकरांचा होता.


"हेलो..."


"हेलो.. हा कुणाचा नंबर आहे? आताच मी १०-१२ मिस कॉल पाहिले"


"मी समीर बोलतोय. समीर वामन खानोलकर. तुमचा पी. जी.. आपलं फोनवर बोलणं झालं होतं. मी मुंबईत आलोय. तुमचं घर सापडेना म्हणून फोन केलेला पण तुम्ही उचलला नाही.."


"सॉरी.. खरंच खूप सॉरी.. मी कामात गुंग होते आणि फोन सायलंटवर होता हे लक्षात आलंच नाही.. आता मिस कॉल पाहिले.."


"मी खूप घाबरलेलो. आता पुन्हा दादर स्टेशनला निघालो होतो."


"आता कुठे आहेस?"


"मी आता स्वामींच्या मठाजवळ आहे"

"अच्छा.. थांब तिथेच.. मी येते तुला घ्यायला."

त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या जिवात जीव आला. खरंच ही सारी स्वामींची कृपा होती. मी पुन्हा हात जोडले आणि मनापासून त्यांचे आभार मानले. 
मी उभा होतो. इतक्यात एक वयस्कर बाई येताना दिसली.

"समीर??"


"हो"


"मी मनोरमा दिक्षित. चल सोबत माझ्या.. दोन बिल्डिंग सोडून आपलं घर आहे."


आम्ही घरी आलो आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. सामान खोलीत ठेवलं इणि फ्रेश झालो. दिवसभरात जाम थकलो होतो पण अखेर मुंबईत आलोच ह्या उत्साहात तो जाणवत नव्हता. मला अतोनात आनंद झाला होता.

"काय रे सामान ठेवलं का व्यवस्थित? ये दोन घास गरम जेवून घे.. थकला असशील.. जेवला की बरं वाटेल. शांत झोप लागेल.. माझ्यामुळ्ये उगाच तुझी गैरसोय झाली."


"आजी.. All is well that ends well..तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊ नका"

मी जेवायला बसलो. भूक लागलीच होती. आजींच्या हाताला चव होती. जेवल्यावर छान वाटलं. बिछान्यावर पडलो तशी लगेच शांत झोप लागली. मुंबईतली पहिली रात्र. उद्यापासून एक नवं आयुष्य सुरू होणार होतं. एक नवीन प्रवास.. तो पर्यंत डोळ्यांत स्वप्न घेऊन लागलेली ती पहिली शांत झोप..


रात्र ही सरणार
घेऊन स्वप्नं नवी..
दिवस नवा उजाडणार
सुखाचा आरंभ होणार..



to be continued..



- निनाद वाघ

No comments:

Post a Comment